मुंबई | गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 140 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘गुजरातमध्येही पडलेला ब्रीज हा ‘अॅक्ट ऑफ फ्रॉड’ झाला आहे. तसेच गुजरातमध्ये भाजपला नाकारावे म्हणून ईश्वराने दिलेला हा संदेश मानावा का?’
मोरबी येथील हा पूल पडल्यानंतर काँग्रेसने एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. पटोले यांनी ट्विटर शेअर केलेला हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील मदारीहाट येथील 7 एप्रिल, 2016 रोजी झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेचा आहे. नेमकं त्यापूर्वीच्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये एक पूल कोसळून दुर्घटना घडली होती. त्यावेळी मोदींनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. हाच व्हिडिओ पटोले यांनी शेअर केला आहे.
ट्विट करत नाना पटोले यांनी म्हटले की, निवडणुकीच्या तोंडावर ब्रीज पडला असताना इतक्या खालच्या पातळीचे राजकारण मोदींनी केले होते. मग आता त्यांच्याच म्हणण्यानुसार, गुजरातमध्येही पडलेला ब्रीज हा ‘अॅक्ट ऑफ फ्रॉड’ झालाय. तसेच गुजरातमध्ये भाजपला नाकारावे म्हणून ईश्वराने दिलेला हा संदेश मानावा का?