पुणे | सगळ्याच लढाया तलवारीने जिंकता येत नाही. शिवचरित्राचे पारायण म्हणजे अफजल खानाचे पोट ते शाहिस्तेखानाचे बोट नाही. त्यामागे मोठा इतिहास आहे. तुमचे माझे आयुष्य घडविणाऱ्या आलौकिक गुणांची या शिवचरित्रात रेलचेल आहे. यातील कोणताही एक गुण आत्मसात करता आला तर उदंड मोठं होता येईल. प्रचंड यश मिळेल, शिवचरित्राचे पारायण प्रत्येक घरात व्हावे, असे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितले.
लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित हिंदुस्थानातील पहिले शिवचरित्र सामुदायिक पारायण सोहळ्याचा समारोप सोमवारी (दि.31) झाला. यावेळी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. नारायणपूरचे नारायण महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य व संस्थेचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील, लोकसेवा ई-स्कूलच्या प्राचार्या जय चेतवानी, युवा स्पंदन संस्थेचे कार्यकर्ते, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते म्हणाले, जगात अनेक महापुरूषांचे पुतळे आणि स्मारक दिसतील, पण त्या सर्वात जास्त स्मारकं आणि पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही, प्रांत नाही ज्या प्रांतात, क्षेत्रात आपण आदर्श म्हणून शिवाजी महाराजांचा उल्लेख करत नाही. इतकं सर्वव्यापी व्यक्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. 350 वर्षांपूर्वी या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. आम्ही त्याला युवक प्रवर्तक मानतो, तसेच छत्रपतींनी अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन संघर्षातून सुराज्य स्थापन केले, नियोजन काय असते याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘सेवा म्हणजे स्वत: जाळून घ्यावे लागते आणि मग समाजाला उज्ज्वल करावे लागते. मार, प्रहार सोसावे लागतात. मान, अपमान सहन करावे लागतात. हे सर्व सोसायची, सहन करायची तयारी असावी लागते. मी अभिमानाने सांगतो, दीपक पायगुडे यांनी हा सगळा प्रवास समाजाची कायमस्वरूपी परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सेवा करत घालवला आहे’, अशा शब्दांत कौतुक केले.
इतिहासातील संशोधनाच्या कार्यासाठी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांना नारायणपूरचे नारायण महाराज यांच्या हस्ते ‘लोकसेवा जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नरहरी पाटील यांनी केले व प्राचार्या जया चेतवानी यांनी आभार प्रदर्शन केले.