मुंबई | राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांची राजगृह येथे भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीची चर्चा सुरू आहे. पण तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी आंबेडकरांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीमागचे कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले असून, ही भेट राजकीय नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
या भेटीबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, “मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली ही वास्तू पाहिली. यात कोणतंही राजकारण नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती.”