मुंबई | राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विविध घोषणांचा धडाका सुरु आहे. त्यानंतर आता कौशल्य विभागाच्या पुढाकाराने एक लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रात नियोजित असलेले अनेक प्रकल्प इतर राज्यात जात असल्याचे म्हणत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. हे नियोजित प्रकल्प इतर राज्यात गेल्याने हजारो तरुणांचे रोजगार गेल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता राज्य सरकारने कौशल्य विभागाच्या पुढाकाराने राज्यात एक लाखापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यानुसार, आज सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सर्वाधिक भर रोजगारावर असावा : देवेंद्र फडणवीस
‘आमच्या सरकारचा सर्वाधिक भर हा रोजगारावर असला पाहिजे. असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी घेतला आहे. देशात शासकीय रोजगारावरची अघोषित बंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूर केली. 10 लाख रोजगार देण्याचा निर्णय केला. त्याअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने 75 हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा निर्णय केला. त्याचसोबत खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.