मुंबई | ”महाविकास आघाडी सरकार असो किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यात ‘100 खोके देऊनही सरकार येऊ देणार नाही’, असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टींनी (Raju Shetti) दिला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, ”आमचे दोन दिवसांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यांनी चर्चेलाही बोलावलं नाही. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वेठीस धरणारे आंदोलन करावे लागेल. साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांचे विषय दोन महिन्यांपासून हाती घेतले आहेत. दुर्दैवाने राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी सरकार असो किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही”.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यमार्गावरही आंदोलन केले जाणार आहे. अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्ग बंद ठेवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.