मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यातच आता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वक्तव्य केले. ”छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे”, असे गडकरी म्हणाले.
नितीन गडकरींच्या कार्यालयीन ट्विटर हॅंडलवरून 30 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, ”छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे.”
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर भाजप नेत्यांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. तसेच यातील बहुतांश नेतेमंडळींनी शिवाजी महाराज यांच्याबाबत आदर व्यक्त केला आहे.
काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय.