पुणे | राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने अपर पोलीस महासंचालक, सह आयुक्तांच्या बदल्या केल्या असून सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक रितेशकुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्थाच्या अपर पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोमवारी स्वीकारणार असल्याचे रितेशकुमार यांनी सांगितले.
नवे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी यापूर्वी कोल्हापूर, सांगली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात काम केलं आहे. त्यांनी राज्य राखीव पोलीस दलात देखील काम केलं असून ते मुंबईत काहीकाळ पोलीस उपायुक्त राहिलेले आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ (AMBIS) या संगणकीय प्रणालीचा वापर रितेश कुमार यांच्या योगदानामुळं सुरू झाला होता.
दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनयकुमार चौबे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्यातील अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची सीआयडीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.