नागपूर | बहुचर्चित, बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचे उद्घाटन दोन दिवसांपूर्वी झाले. पण या दोन दिवसांत तीन अपघात झाले आहेत. त्यामुळे आता हा समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर मर्सिडिजची स्विफ्टला धडक बसली आहे. हा अपघात नागपूरजवळील वायफळ टोलनाक्याजवळ झाला.
वायफळ टोलनाक्याजवळ भरधाव वेगात असलेल्या मर्सिडिज बेंझने स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मर्सिडिजचा चुराडा झाला. स्विफ्टचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. टोल भरण्यासाठी स्विफ्ट कार टोलनाक्यावर थांबली होती. त्यावेळी भरधाव मर्सिडिजने स्विफ्टला धडक दिली.
दरम्यान, या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसून दोन्ही कारचालकांनी हे प्रकरण आपापसात सोडवल्याची माहिती आहे. मर्सिडिज चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे.
11 डिसेंबर रोजी उद्घाटन
समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर हा महामार्गही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.