नाशिक | शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना, कोणतेही सरकार हे कायम राहत नाही. २०२४ मध्ये सरकार देखील बदलणार आहे. त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा विरोधकांना देखील त्यांनी टोला लगावला आहे.
आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचिट मिळाली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. नवे सरकार आल्यावर ज्या गोष्टी घडल्या त्यातील एक म्हणजे सोमय्यांना मिळालेली क्लिनचिट आहे. आयएनएस विक्रांतच्या संदर्भात पैसे गोळा झाले आहेत. पैशांचा अपहार झाला आहे. पैसे राजभवनमध्ये गेले म्हणतात. राजभवन सांगते पैसे आलेच नाही. मग हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे असेदेखील राऊत म्हणाले.
क्लिनचिट कशी मिळते हे राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजे. आमच्या लोकांना मात्र क्लिनचिट मिळत नाही. हा ईडीच्या अखत्यारीतला विषय आहे. राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित विषय असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी विविध विषयांना देखील हात घातला.
मोर्चा सबंधित बोलताना, जे आंदोलन होत आहेत ते लोकशाही मार्गाने होत आहेत त्यामुळे सरकार यात कोणतीही आडकाठी आणू शकत नाही त्यांना मोर्चाला परवानगी द्यावी लागेल कारण देशात अजूनही लोकशाही आहे. महापुरुषांबाबत होणारे वादग्रस्त विधानांचं सरकार समर्थन करते मग या विरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर, महाविकास आघाडी कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न यावरुन संतप्त झाली आहे. याविरोधात १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. जरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले असले तरीसुद्धा सीमाभागात तणाव आहे. आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. काय होते ते बघू. पण सीमाभागाचा प्रश्नही महत्वाचा असल्याचे राऊत म्हणाले.
जर आम्ही मोर्चा काढावा असे तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही राज्यपालांना हटवायला पाहिजे होते. तुम्हा भाजपच्या प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. कारवाई केली नाही मग आम्ही आता मोर्चा काढणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.