नागपूर | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना भर सभागृहात माफी मागावी लागली.
बुधवारी झालेल्या सत्रात छगन भुजबळ यांनी मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचा उल्लेख विधानसभेत केला होता. छगन भुजबळांच्या या विधानावर भाजपचे आमदार आक्रमक झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी मुंबई सर्वांची आहे, मुंबईबाबत कुणीही असं वक्तव्य करू शकत नाही. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी आमची भूमिका आहे. पण काहींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असे अजित पवार म्हणाले होते.
त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीचे नेते असलेले जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या विधानानंतर अजित पवार यांना आजही भर सभागृहात माफी मागावी लागली. दोन दिवसांत त्यांना दोनदा माफी मागावी लागली.