भ्रष्टाचार भाजपचा डीएनए नाना पटोलेंचं विधान
मुंबई | राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. राज्यात नवी समीकरणे तयार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळातही काही समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या काही पदाधिकाऱ्यांसह भाजपसोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहे. आणि त्यात अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील असल्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
धनंजय मुंडे यांच्यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघातून विस्थापित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं असून त्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच सुरू झाली आहे.
पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे, यासंबंधी प्रश्न विचारला असता नाना पटोले यांनी त्यावर स्वागत आहे असं म्हटलं. पटोले यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसचे लोक सोडून जातील असं सांगितलं जात होतं. भाजप काँग्रेसची बदनामी करण्याचं काम करत आहे. आमचे कोणतेही नेते सोडून जाणार नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो ते खरंच निघालं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप नेहमीच लक्ष विचलीत करत आला आहे. केवळ काँग्रेसची बदनामी करण्यासाठीच हे सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये भाषण केलं त्यादरम्यान, राष्ट्रवादीवर 70 हजार कोटीचा आरोप केला. त्यांच्या या भाषणाचे व्हिडीओ आम्ही लोकांना दाखवणार आहोत. बुलढाण्यात मोठा अपघात झाल्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी शपथविधी सोहळा आयोजित केला. भाजपला लाजही वाटली नाही. भाजपचा हा चेहरा आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भ्रष्टाचार भाजपचा डीएनए
ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडण्याचं काम सुरु आहे. भष्ट्राचार हा भाजपचा डीएनए आहे. भाजपच्या रक्तात विचारात भष्ट्राचार आहे. भ्रष्टाचार वाढवणं, त्याला पाठी घालणं हे देखील भाजप करते. कर्नाटकाच्या निवडणुकीत वेगळं काय घडलं? पण कर्नाटकाच्या लोकांनी त्यांना जागा दाखवलं, अशी टीकाही त्यांनी केली.