मुंबई | राजकीय वर्तुळात सातत्याने घडामोडी घडताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीत आता दोन गट पडल्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पक्षात गट पडल्यानंतर शरद पवारांनी आपण न्यायालयीन लढाई लढणार नाहीत तर आपण जनतेच्या न्यायालायत जाणार असं जाहीर केलं होतं. पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ही पहिलीच जाहीर सभा आज कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यातील येवला बाजार समितीच्या पटांगणात दुपारी ४ वाजता होत आहे. त्यामुळे शरद पवार या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर मुंबईतील एमईटी इंस्टीट्यूट येथील पहिल्याच सभेत जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी भुजबळांनी वसंतदादा पाटील, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देत वर्मावर बोट ठेवलं होतं. यानंतर आता शरद पवार याबद्दल काही भाष्य करणार का हेदेखील पाहावे लागेल.
छगन भुजबळ यांनी आपल्या सभेत बोलताना, साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या अशी विनंती त्यांनी शरद पवारांना केली होती.
तसेच आजही माझ्या मनात शरद पवार यांच्याबद्दल प्रेम आहे. पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांना देखील असचं वाईट वाटलं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो. तेव्हा त्यांच्यासोबत ओबीसीच्या मुद्द्यावर मतभेद झाले, तेव्हा ३६ लोक तुमच्यासोबत आले. मला सुद्धा येणं भाग पडलं. तुम्ही तिथं थांबा म्हणून सांगितलं नाहीत. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांनाही असंच वाईट वाटलं. धनंजय मुंडेंना घेतलंत तेव्हा काका असलेले गोपिनाथ मुंडे आणि बहिण पंकजा यांच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते. या सगळ्याची पुनरावृत्ती व्हायला लागली आहे, असे छगन भुजबळ म्हणाले होते.
या बंडाचे आव्हान परतून लावण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. त्याची सुरुवात छगन भुजबळ यांच्या मतदार संघातून होणार आहे. छगन भुजबळांसह बंडखोरांचा ते कसा समाचार घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.