क्यूएस आय-गेजतर्फे दुसऱ्या शैक्षणिक गुणवत्ता परिषदेचे उद्घाटन
पुणे | जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रातील भारताची नियोजनबद्ध वाटचाल या विषयावर आधारित क्यूएस आय-गेजतर्फे दुसरी शैक्षणिक गुणवत्ता परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. डॉ. व्ही कामकोटी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतातील शिक्षण व्यवस्थेतील भागधारकांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षण व संशोधनाची मानसिकता जोपासणे आवश्यक आहे. आयआयटी सारख्या संस्था व इतर भागधारकांनी ग्रामीण स्तरावर हस्तक्षेप करुन देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि परवडणारे शिक्षण बनवणे आवश्यक आहे असे कामकोटी यांनी सांगितले.
तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नोंदणी गुणोत्तर सुधारणे, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन मानसिकता, उद्योजकता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे, भारतीय ज्ञान प्रणालीचे आंतरराष्ट्रीयीकरण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे देखील ते म्हटले आहेत.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, निम्सचे माजी कुलगुरू आणि एफआयसीसीआय एचइएलचे सल्लागार प्रा. डॉ. राजन सक्सेना, क्यूएस आय-गेजचे प्रादेशिक संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अश्विन फर्नांडिस, क्यूएस आय-गेजचे कार्यकारी अधिकारी रवीन नायर, आणि राघव शर्मा उपस्थित होते.
वैश्विक स्तरावर भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या दर्जेदार शिक्षणाच्या शोधात आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत बदल करणे मोठे काम आहे. जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रातील भारताची नियोजनबद्ध वाटचाल तयार करणे शक्य असले तरी, ही परिस्थिती आधारित प्रणाली आहे. त्यासाठी आपल्याला डेटाबेसचे सांख्यिकीय मूल्यमापन करणे गरजेचे आहे.
- प्रा. डॉ. सुरेश गोसावी
शिक्षणासाठी भारत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात कमी पडत आहे. अशा वेळेस जागतिक स्तरावर आपली संस्थात्मक प्रतिष्ठा सुधारण्याची गरज आहे. विद्याशाखा सक्षमता विकास, विद्यार्थी केंद्रीतता, पीएचडी कार्यक्रमांसाठी निधी वाढविणे, डिजिटल तंत्रज्ञान आणि कौशल्यांचा लाभ घेऊन जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहचलो तर येत्या दशकात आपल्या शिक्षण पद्धतीत लक्षणीय सुधारणा करू शकू.
- प्रा. डॉ. राजन सक्सेना
क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या नवीनतम आवृत्तीमध्ये ४५ भारतीय विद्यापीठांपैकी महाराष्ट्रातील फक्त ३ आणि पुणे शहरातील १ विद्यापीठाचा समावेश आहे. त्यामुळे पुण्याला पुन्हा ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ हा बहाल मिळवणे गरजेचे आहे.
- डॉ अश्विन फर्नांडिस
आम्ही नवोपक्रम आणि संशोधनावर वाढता भर, प्रायोगिक व आंतरविद्याशाखीय शिक्षणाकडे वळणे, रोजगारक्षमता आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. संमेलनातील सखोल विचारमंथन शैक्षणिक क्षेत्रासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अमूल्य अंतर्दृष्टी म्हणून काम करेल.
यावेळी सेजल जोधावत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दरम्यान, क्यूएस आय-गेज ही एक व्यापक आणि स्वतंत्र रेटिंग प्रणाली आहे. जी क्यूएस क्वासका रेल्ली सायमंड्स (Quacquarelli Symonds) द्वारे भारतीय संस्थांचे मूल्यांकन आणि गुणवत्ता ओळखण्यासाठी विकसित केली आहे. भारतीय उच्च शिक्षण संस्थांना स्वयं-मूल्यांकन आणि गुणवत्ता वाढीसाठी एक मजबूत फ्रेमवर्क प्रदान करून जागतिक मान्यता आणि उत्कृष्टतेपर्यंत पोहोचविण्यास सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.