सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे | माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने शहरातील गंगाधामजवळील माँ आशापुरा माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे चेतन भंडारी यांनी दिली.
यावर्षीच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात रविवारी घटस्थापनेनं होणार असून पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. याबरोबरच नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, नवदुर्गा सन्मान, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, महिला कर्मचारी सन्मान, देवी सुक्तम पाठ आदी कार्यक्रम होणार आहेत.
नवरात्र उत्सवामध्ये सकाळी आरती होणार असून ७ ते ९ च्या दरम्यान अभिषेक होणार आहेत. नवचंडी महायज्ञ दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम माता की चौकी होणार आहे. तसेच, विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. कन्यापूजन करण्यात येणार आहे. यावेळी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. महिला सशक्तीकरणाविषयीचे चर्चासत्र आयोजित केले आहे. अशी माहिती अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
माँ आशापुरा ही राजस्थानमधील अनेकांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात आशापुरा मातेचे मंदिर नसल्याने पुणे आणि परिसराबरोबरच महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परंतु, मूळच्या राजस्थानमधील लोकांना लग्न कार्यानंतर अथवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानमध्ये जावे लागत असे. नागरिकांना इथेच आशापुरा मातेचे दर्शन घेता यावे म्हणून विजय भंडारी आणि परिवाराने गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा मातेचे भव्य मंदिर बांधले. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरुपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
दरम्यान नवरात्र उत्सव हा माता-भगिनींप्रती आदर व्यक्त करण्याचा उत्सव आहे. देवी-देवता या आपल्या माता-भगिनींच्या रुपातच आपल्या सोबत आहेत. त्यांचा सन्मान करणे म्हणजेच देवीचा सन्मान करणे होय. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कार्यकाळात माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आशापुरा माता मंदिरात होत असलेल्या नवरात्र उत्सवात माता-भगिनींचा सन्मान करण्यासाठी आणि आशापुरा मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केले आहे.