फुटपाथवर आयुष्य काढणाऱ्या बेघर लोकांचे विदारक वास्तव
पुणे । शहरात रस्त्यावरून जाताना सिग्नल जवळ गाडी थांबली तर लगेच कुणीतरी काही बाही विकताना तुम्ही पाहिलं असेल.नेकदा कधी पेन कधी टिशू पेपर, गजरा तर कधी पुष्पगुच्छ घेऊन अनेक चिमुकली मुलं सिग्नल थांबताच धावतपळत आपली वस्तू घेण्याची विनंती करत असतात.हि लोकं भीक मागून नाही तर आपल्याजवळ असलेलं कौशल्य दाखवून,एखादी वस्तू विकून पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड असते.सध्या सगळीकडे दिवाळीचा झगमगाट आहे.घरोघरी गोडधोडाची रेलचेल आहे.पण तुमच्या मनात हा विचार कधी आलाय का ? या बेघर लोकांची दिवाळी नेमकी कशी साजरी होत असेल. दिवाळी फराळ करतात का? अभ्यंगस्नान कसं असतं.मुला बाळांच्या शिक्षणाचं काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सदर व्हिडिओतून फॉर द पीपल न्यूज ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ऐतिहासिक पुणे शहराच्या महापालिका भवन भागात अनेक बेघर लोकं राहतात. सध्या दिवाळी सुरु आहे.सगळीकडे दिव्यांच्या प्रकाशानी झगमगाट झालेला आहे. घरी अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, भाऊबीज साठी जय्यत तयारी सुरु आहे. गोड धोड दिवाळी फराळ बनवला जात असताना पुणे शहरातील बेघर लोकांची दिवाळी अंधारात आहे.हे लोक भिक मागताना दिसत नाहीत.ही लोकं, मुलं चौकाचौकात फुलांचे गजरे विकताना, पेन विकताना, चित्रकलेची पुस्तकं विकताना दिसतात आणि विशेष म्हणजे ते त्यांच्या पुढच्या पिढीला शाळेत देखील पाठवतायत.
एकीकडे आपण आपला भारत देश महासत्तेच्या दिशेनं चाललाय याच्या गोष्टी करतोय आणि दुसरीकडे फुटपाथवर आयुष्य काढणाऱ्या बेघर लोकांचे हे विदारक वास्तव आपल्या समोर आहे.एकीकडे प्रकाशाचा झगमगाट आहे.घरात गोड धोड आहे.दिवाळी उत्साहात सुरु आहे तर, दुसरीकडे उघड्यावर संसार आणि फुलांचे गजरे, फुगे, पेन, रेडीमेड वस्तू, खेळणी, पुष्पगुच्छ विकून पोट भरणाऱ्या बेघरांची दिवाळी अंधारातच आहे. दिवाळी हा खरंतर सुखाचा, आनंदाचा, प्रकाशाचा सण. पण दुर्देवाने प्रत्येकासाठी तो सारखा नसतो. बेघर लोकांसाठी मोकळं आभाळ आणि उघडी जमीन हेच त्यांचं घर. परिस्थितीमुळं रोजच्या जगण्याच्या लढाईसमोर दिवाळीचं त्यांच्यासाठी फारसं कौतुकच नाही. कुणी काही दिलं तरच दिवाळी नाहीतर.रोजचा दिवस सारखाच. या बेघर उपेक्षितांचं वास्तव समाजासमोर मांडण्याचा फॉर द पीपल न्यूज नं केलेला हा अल्पसा प्रयत्न केला आहे.