खडसे व मुख्यमंत्री शिंदेंमध्ये भावनिक संवाद
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून बोलताना भावनिक संवाद साधला आहे. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर, माझ्या विमानाचं लँडिंग झालंच नसतं असे म्हणत खडसे यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले.
नाथाभाऊ आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील मोबाईल कॉलवरील हा संवाद सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आणि त्याची चर्चादेखील तेवढीच रंगली आहे..
नाथाभाऊंना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ एअर अम्बुलन्स पाठवून खडसे यांना मुंबईत उपचारासाठी आणण्याची व्यवस्था केली होती. एकनाथ खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचं हृदय बंद पडलं होतं आणि शॉक देऊन डॉक्टरांनी ते सुरु केल्याचं नाथाभाऊ यांनी मोबाईल फोनवर मुख्यमंत्री शिंदे यांना सांगतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, नाथाभाऊ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी त्यांचे ओएसडी मंगशे चिवटे यांना रुग्णालयात पाठवले आणि मोबाईलवर फोन करून नाथाभाऊंशी संवाद साधला. यावेळी दोघांमधील संवाद हा भावनिक होता.यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करत दिवाळीच्या देखील शुभेच्छा दिल्या.
राज्यातल्या राजकारणातील असे संवाद हरपत चालले असताना मुख्यमंत्री शिंदे आणि नाथाभाऊ यांच्यातील हा संवाद विशेष महत्वाचा वाटतो.