पुणे । सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयात अमृतमहोत्सवी भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाने सर्वसामान्य भारतीयांना दिलेले अधिकार व त्यांची कर्तव्ये याचे शिक्षण देण्याचे हे एक व्यासपीठ असते. हाच विचार घेऊन सूर्यदत्त विधी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या संविधान दिन कार्यक्रमात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठ्यक्रमाला अवांतर उपक्रमांची जोड देण्यावर अधिक भर असलेले प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारतीय संविधान हे नागरिकांसाठी दीपस्तंभासारखे आहे. जे त्यांना त्यांच्या मार्गाचे मार्गदर्शन करतात आणि त्यांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतात. संविधान आणि त्यातील मूलभूत मूल्यांचा आदर करणे ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.”
सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यापक केतकी बापट यांनी स्वागत-प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विधी महाविद्यालयासह सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च, सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थी व शिक्षकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच संवैधानिक मूल्ये जपण्याचा आणि त्यांचे पालन करण्याचा संकल्प केला.
दरम्यान, सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सुर्यदत्त लॉ कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ.मिथिलेश विश्वकर्मा यांनी प्रबोधनात्मक आणि ज्ञानसंपन्न भाषण केले.
यावेळी सूर्यदत्त लॉ कॉलेज च्या द्रृश्या नेडुंगडी व शांभवी श्रीवास्तव या विद्यार्थिनींनी प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी भारताचे संविधान – ‘अपेक्षा व वास्तव’ या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.संविधान दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली.11वी वाणिज्य शाखेतील सुमन चेतन परिहार हिने प्रथम क्रमांक पटकावला तर 11वी वाणिज्य शाखेतील दीपादेवी प्रजापती ही उपविजेती ठरली. त्यांना प्राचार्य प्रा.डाॅ. मिथिलेश विश्वकर्मा, प्राध्यापक केतकी बापट व प्राचार्या डॉ.सीमी रेठरेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व अॅनिमेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तेजल निकम यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रिष्म सुराणा व आख्या उपमन्यू यांनी केले. तसेच आभार सुर्यदत्त लॉ कॉलेज च्या सहाय्यक प्राध्यापक डाॅ. मोनिका सेहरावत यांनी मानले.