मराठा आरक्षणासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्यातील अंतरवाली सराटी इथून सुरु झालेल्या आंदोलनाचा नवी मुंबईमध्ये शेवट झाला. या आंदोलनादरम्यान आंदोलनाच्या निर्णयाक क्षणी सरकार आणि मराठा आंदोलक यांच्या दरम्यान निर्णयाक भूमिका बजावलेली व्यक्ती कोण म्हणून सगळीकडंच या व्यक्तीची चर्चा होतेय. ती व्यक्ती म्हणजे मंगेश चिवटे. पत्रकार असलेले मंगेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास कसे झाले… यासंबंधी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ऑगस्ट २०२३ मध्ये आरक्षणासाठी मराठ्यांचं आंदोलन सुरू झालं. जालन्यातील आंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. आणि त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला. रातोरात हे आंदोलन मोठं झालं. राज्यव्यापी बनलं आणि गेली पाच सहा महिने उपोषण, मोर्चे, जाहीर सभा या माध्यमातून आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु ठेवला. सरकारकडून अनेक शिष्टमंडळं चर्चेसाठी जरांगे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आली. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायाधीश, नेते आणि सरकारमधील मंत्र्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात अनेक नेते बदलत राहिले मात्र, एक माणूस कॉमन होता. अगदी सुरुवातीपासून ते आरक्षणाचा जीआर मिळेपर्यंत, जीआर मिळाल्यानंतर मराठा समाजानं या व्यक्तीला खांद्यावर उचलत, गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. तो माणूस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे.. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख असलेले आणि मूळचा पत्रकारितेचा पिंड असेलले मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांचे खास बनले. त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात काय महत्वाची भूमिका साकारली. परंतु, इथपर्यंतची त्यांची वाटचाल कशी होती? ते पाहुयात…