काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे . अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची गणितं बिघडली आहेत. तर महाविकास आघाडीच्या अडचणी वाढवल्या आहेत. दुसरीकडे याचा भाजपला फायदा झालाय. 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे.
या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये सध्या तरी प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करण्यासाठी भाजपचं मेगा प्लॅन सुरु केला आहे. अनेक आमदारांनी अशोक चव्हाण यांना समर्थन दाखवलं आहे. मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे लगेच अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणं आमदारांना शक्य नाही. राज्यसभेच्या एका उमेदवाराला 40.9 चा कोटा ठरलेला आहे तो काँग्रेस पूर्ण करते. मात्र गुप्त मतदान असल्याने कांग्रेसचे काही आमदार क्रॉस वोटिंग करण्यासाठीचा मोठा प्लॅन सुरु करत आहे. महायुती सहापैकी पाच जागा जिंकत आहे मात्र एक जागा काँग्रेसला जाताना पाहायला मिळत आहे. क्राॅस वोटींगमुळे सहावी जागा ही महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सहा जागांसाठी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहे. भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 39 आमदार आणि 10 अपक्षांची मतं आहेत. त्यानुसार शिंदे गटाची एक जागा निवडून येऊ शकेल.काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही.पण अशोक चव्हाण भाजपमध्ये आमदार जास्त घेऊन आल्यास हे गणित मात्र बिघडू शकतं..
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. 12,300 रुपयांची थकबाकी तातडीने भरण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही घाईघाईने सोमवारी संध्याकाळी एनओसी जारी केली आहे. यामुळे चव्हाण यांना घाईघाईने एनओसी देणे ही राज्यसभेची पूर्वतयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.