मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांचाच पक्ष असल्याचा निर्वाळा देत त्यांच्या आमदारांच्या विरोधातील अपात्रतेची याचिकाही फेटाळून लावली. यावेळी बोलताना, शरद पवारांच्या मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नव्हती. पक्षांतर्गत मतभेदातून दोन गट तयार झाले होते. पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद होते. त्या मतभेदाच्या विरोधात अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. नेतृत्वाच्या निर्णयाविरोधात किंवा भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त करणं म्हणजे पक्षात फूट पडली असं होत नाही, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दोन्ही गटाचे सर्व आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवताना नार्वेकर म्हणाले, प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत..
दरम्यान, 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा याठिकाणी दाखला द्यावा लागेल. विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहिली तर अजित पवार गटाकडे ४१ आमदार आहेत त्यामुळे त्यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. त्यामुळे सर्व याचिका डिसमिस करण्यात आल्या आहेत असं नार्वेकरांनी सांगितलं आहे.