राज्यसभेसाठी महायुतीचे चार उमेदवार जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. दहा नावं देखील चर्चेत होती. मात्र चर्चेतील एकाही नावापैकी कुणाचीही वर्णी न लागता प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत आणि त्यांची टर्म २०२७ मध्ये संपणार आहे… तरीदेखील त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली याचीच चर्चा त्यानंतर सुरु आहे… असं काय घडलंय की प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी द्यावी लागली… या व्हिडिओमधून आपण त्यासंदर्भात सविस्तरानं जाणून घेऊयात…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून एक नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार होता. त्यांनी येण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ‘तो’ नेता न आल्याने अचानक प्रफुल पटेलांना तीन वर्षांची टर्म शिल्लक असताना उमेदवारी दिली गेली. त्याबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदावारीसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह 8-10 जण इच्छुक होते. त्यामुळं एकाला उमेदवारी देऊन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इतरांचं नाराजीनाट्य नको, यासाठी अजित पवारांनी प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिली असल्याची देखील चर्चा आहे.