मुंबई | लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा होतीय ती म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची. त्यांच्या भेटीमुळे मनसे महायुतीत सामील होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीत केंद्रीय अधिवेशनात सहभाग घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. एक तास चाललेल्या या बैठकीत आशिष शेलार यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींचा निरोप आणला होता का? असंही बोललं जात आहे..परंतु महायुतीला मनसेची साथ का हवी आहे. महायुतीमध्ये जर राज ठाकरे सामील झाले तर त्याचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय फायदा होऊ शकतो? याविषयी जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा..
नुकतीच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात भेट झाली आणि तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या…माध्यमांसमोर या दोन्हीही नेत्यांनी याविषयीचं बोलण टाळल्याचं दिसलं तर आशिष शेलार यांनी काही गोष्टी गुलदस्त्यातच राहिलेल्या बऱ्या असं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या महायुतीत येण्याने काय फरक पडू शकतो?
राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत आणि हाच तिन्ही पक्षांमधील समान धागा आहे. २००९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेने २८८ पैकी १३ जागांवर झेंडा फडकवला यामध्ये मुंबईत ६, ठाण्यात २, नाशिकमध्ये ३, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी १ आमदार निवडून आले होते आणि २४ हून अधिक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दुसऱ्या क्रमांकावर होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एकाच जागेवर मनसेने विजय मिळवला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत एकाच जागेवर विजय मिळवला.
२००९ व २०१४ ची लोकसभा निवडणूक मनसेने लढवली पण 2019ची लढवली नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकूण ११ उमेदवार रिंगणात होते…तर २०१४ मध्ये १० उमेदवार उभे होते या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेला हार पत्करावी लागली होती..२०१४ला स्वतःचे उमेदवार उभे करून त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता…त्यांची ती खेळी राजकीयदृष्ट्या चुकली होती.
२०१९ मध्ये राज ठाकरे यांनी मोदींच्या धोरणांना विरोध केला होता पण उमेदवार उभे केले नव्हते. परंतु, काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. लाव रे तो व्हिडिओ ही राज ठाकरेंची मोहीम त्यावेळी प्रचंड गाजली होती…
आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे पुन्हा राजकारणात अधिक सक्रीय झालेले पाहायला मिळतात…भाजप यंदा मिशन 45+ च्या तयारीत आहे आणि मराठी मत मिळवण्यासाठी एकमेव चेहरा म्हणून नक्कीच राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे निवडणुकांमध्ये मतांची विभागणी झाली तर याचा फायदा विरोधी महाविकास आघाडीला होईल आणि त्यामुळेच भाजपला मनसेला सोबत घेऊन चालावं लागेल. याबरोबरच उद्धव ठाकरे यांची सहानुभूती तोडण्यासाठी आणि त्यांची मते खेचण्यासाठी देखील राज ठाकरे यांची भाजपाला गरज आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या येण्याने महायुतीची ताकद वाढेल असं म्हटलं आहे अर्थात त्याचं स्वागतच केलं आहे त्यामुळे मनसे भाजप सोबत कशी येणार? त्याचं गणित काय असणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.