मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे हिंसक वक्तव्य करत आहेत त्या वक्तव्याची आता एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल्यानंतर आता राज्य सरकारही आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं का? यामागचं सर्व षडयंत्र बाहेर येईल असा इशारा दिला आहे.
त्याचबरोबर मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं हे पूर्ण समाजाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले असले तरी त्यानंतर मराठा समाज त्यांच्या नाही तर माझ्या पाठीशी उभा राहिला आहे.
कोणी कोणाची आई बहीण काढेल, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव सांगतो. छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया-बहिणी काढायच्या? खरं तर माझी त्यांच्याबाबत तक्रारच नाही. पण या सर्वामागे कोण आहे हे शोधायलाच हवं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न होत असेल, त्यांना पैसे कोण देतंय? त्यांना मदत कोण करतंय? हे सर्व बाहेर येईल. तुमच्याविषयी जरी कोणी बोललं तर तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील. जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणंदेणं नाही. मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधलं जाईल. छत्रपती संभाजीनगर याठिकाणी वॉर रुम कोणी सुरु केली, याची सखोल चौकशी होईल.
एसआयटी चौकशी करा नार्वेकरांचे आदेश
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गृह विभागाला मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले दिले. हिंसा अथवा हिसंक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.