मुंबई | राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी मात्र टीका करण्याची संधी सोडली नाही.
उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प हंगामी नव्हे तर घोषणांचा पाऊस होता अशी टिप्पणी केली आहे. या टीकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत एकापाठोपाठ एक असा ठाकरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना याचा अर्थ निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट मांडायचाच नाही का? असा सवाल उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना, ज्यावेळी आम्ही दोघं त्यांच्या सरकारमध्ये होतो तेव्हा उद्धव ठाकरे माझं कौतुक करायचे. अर्थसंकल्पाबाबत बोलताना ते म्हणायचे की, ‘फार छान आहे, फार छान आहे’. आता मी इकडे आहे म्हणून ते वेगळी भूमिका घेत आहेत असे पवार यांनी सांगितले आहे.
तर देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरेंची पोलखोल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बजेटचे किती ज्ञान आहे हे उघड करणारा एक किस्सा सांगितला. उद्धव ठाकरे यांनी एकदा केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर एका कार्यक्रमात प्रांजळपणे सांगितले होतं की, मला बजेटमधलं काही कळत नाही. त्यामुळे मी बजेटवर काही बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचे आजचे वक्तव्य पाहता ते लक्षात येते असे फडणवीस यांनी म्हटले आहे.