नाशिक | एकीकडे नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे त्यातच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमध्ये आयोजित केलेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार यावर थेट घोषणाच केली. त्यांची हीच घोषणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी शिंदेचा तो शिलेदार कोण? याविषयी खालील व्हिडीओतून सविस्तरानं जाणून घ्या.
काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघाने अनेक पक्षांना स्थान दिलं आहे आधी कॉंग्रेस, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर इथल्या राजकारणात शिवसेनेनंही आपलं राजकीय स्थान बळकट केले होते. मध्यंतरीच्या काळात मनसेही आली. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इथं शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार राहिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल झालेल्या मेळाव्यात पुन्हा हेमंत गोडसे यांच्या नावाचीच घोषणा केली. त्यामुळे आता गोडसे यांना विजयाची हॅट्रिक मारण्याची ही सुवर्णसंधी आहे. महायुतीतील जागावाटपात शिवसेनेने त्यांच्या 13 खासदार असलेल्या जागांवर दावा केला होता मात्र यातील काही जागा भाजप सोडेल असं वाटत नाही. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातही इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे.
नाशिकच्या जागेवर भाजपाने अप्रत्यक्ष दावा ठोकल्याचं दिसून आलं आहे. ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील आणि तीनवेळा आमदार राहिलेल्या सीमा हिरे यांच्या नावांची भाजपकडून चर्चा सुरु आहे…तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे…परंतु अशातच खासदार शिंदे यांनी जाहीर केलेल्या गोडसेंच्या उमेदवारीविषयी आता भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार ? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे..