नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर आज वाजलं आहे. देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय उत्सवाचा प्रारंभ कधी होणार याची प्रतिक्षा संपली असून निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी निवडणूकांविषयी माहिती दिली आहे.
देशात सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि शेवटचा टप्पा म्हणजेच सातवा टप्पा हा १ जून रोजी पार पडणार आहे आणि ४ जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नागपूर या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. ज्याचं मतदान १९ एप्रिलला होईल. दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. ज्याचं मतदान २६ एप्रिलला होईल. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंघुदुर्ग, हातकणंगले या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.ज्याचं मतदान ७ मे ला होईल. चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड ज्याचं मतदान १३ मे ला होणार आहे तर पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. ज्याचं मतदान २० मेला पार पडणार आहे.
तसेच कुमार यांनी सांगितलेल्या माहितीत, त्यांनी नवमतदार किती आहेत? वृद्ध मतदार किती आहेत? तरुण मतदार किती आहेत? महिला आणि पुरुष मतदार किती आहेत? याची सविस्तर माहिती दिली. ज्यांचं वय ८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर भारतात १०० हून अधिक वय असलेले तब्बल २ लाख मतदार आहेत. १८ हजार तृतीयपंथीय आहेत. ज्येष्ठ नागरिक जेव्हा मतदानासाठी येतील तेव्हा तिथे व्हिल चेअरची आणि अटेंडंटची व्यवस्था असेल.
तरुणाई ही लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती
देशभरातले नागरिक तर मतदान करतीलच पण तरुण हे आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहेत. मोठ्या प्रमाणावर ते मतदान करतील आणि आपले जणू राजदूत बनतील असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. मतदान केंद्रावर सगळ्या सोयी सुविधा असतील असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
देशातल्या १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत वाढली आहे. त्यांच्या मतांचाही निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे
भारतात मतदार किती?
भारतात यंदा ९६ कोटी ८० लाख मतदार आहेत. १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. या तरुणांच्या मतांचा खूप मोठा वाटा या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी टर्मही आमचीच असल्याचा दावा केला आहे. तर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने तिसऱ्या वेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं म्हटलं आहे. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक ही रंगतदार होणार हे नक्की!