अमरावती | गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची जागा विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेसाठी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा अपक्ष लढणार की भाजपामधून लढणार..याचविषयी दिलेल्या व्हिडिओतून सविस्तर जाणून घ्या…
अमरावती लोकसभा मतदार संघात बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो… सध्या बडनेरा विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार आणि नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसच्या सुलभा खोडके या अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत…काँग्रेस पक्षाच्या यशोमती ठाकूर या तिवसाच्या विद्यमान आमदार आहेत…यशोमती ठाकूर या तीन टर्म इथून आमदार राहिल्या आहेत… दर्यापूरमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे हे आमदार आहेत…मेळघाटमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल आमदार आहेत तर अचलपूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचेच बच्चू कडू हे विद्यमान आमदार आहेत…हे झालं सध्याचं चित्र…आता इथल्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याविषयी जाणून घेऊ…
नवनीत राणा यांनी २०११ साली राजकारणामध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर इथली निवडणूक लढवली. परंतु या निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून ४ वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळांकडून राणा यांना पराभव स्वीकारावा लागला होता…तसं पाहायला गेलं तर अमरावती लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा कारण १९९९ ते २०१४ पर्यंत इथं शिवसेनेचा खासदार राहिलाय पण २०१९ सालामध्ये हे चित्र बदललं. २०१९च्या लोकसभेसाठी शिवसेना-भाजपाची युती होती आणि आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते. यावेळी नवनीत राणा मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडून आल्या. या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला होता.
अमरावतीतून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. झालेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना 5,10,947 मते मिळाली तर त्यांच्याविरोधात असलेले आनंदराव अडसूळ यांना 4,73,996 मते मिळाली होती. केवळ 36,951 मतांनीच अडसूळ पराभूत झाले होते.
या पराभवानंतर अडसूळ यांनी राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोप केला आणि ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानंही राणा यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि त्यांना दोन लाख रूपयाचा दंडही ठोठावला होता. राणा दांपत्याने एप्रिल २०२२ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता याप्रकरणी त्यांना मुंबई पोलिसांनी अटकही केली होती. यामुळेही ते चर्चेत आले होते.
आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने दुसरी यादी जाहीर केलीय त्यासाठी गेली अनेक दिवस नवी दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठका सुरू होत्या त्यात मुळची शिवसेनेची असलेली जागा घटक पक्षातील शिवसेनेकडे जाणार का असाही प्रश्न आहे कारण शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी राणा यांनी प्रचार रथातून मेळघाटात प्रचार सुरू केला मात्र या प्रचार रथामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर विजय २०२४ निर्धार रथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रिपाई नेते रामदास आठवले यांचे फोटो होते.
महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली असली तरी संभाव्य असेलल्या उमेदवार राणा यांची उमेदवारी भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. त्याअगोदरच नवनीत राणा यांनी भाजपच्या बड्या नेत्यांचा फोटो वापरून प्रचारात आघाडी घ्यायला सुरूवात केली होती मात्र अचानक हे सर्व प्रचार रथ थांबवण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्याची सूचना आहे…तसेच बच्चू कडू आणि राणा यांच्यातलं राजकीय वैर हेही खूप महत्वाचं आहे. कारण स्वतः बच्चू कडू आणि त्यांचा एक आमदार याच लोकसभा मतदार संघात आमदार आहेत…तसेच या मतदार संघात काँग्रेसचे तीन आमदार आहे त्यामुळे सहा विधानसभा मतदार संघापैकी पाच विधानसभा जर विरोधामध्ये गेल्या तर राणांचा विजय हा दूर राहू शकतो. आता भाजप या संदर्भामध्ये काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल.