बीड | बीड लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्याची बातमी समोर आली आहे. नेमक्या कोणाच्या नावांची चर्चा आहे हेच जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा…
बीड लोकसभा मतदार संघाचं नाव घेतलं तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव समोर येत. गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नावं. त्यांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. प्रमोद महाजनांसोबत त्यांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला त्यामुळे बीडमध्ये भाजपचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या निधनानंतर याठिकाणी त्यांची कन्या प्रीतम मुंडे इथून दोन टर्म खासदार राहिल्या आणि आता भाजपने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची मोठी कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पंकजा यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही विश्वासू मानले जाणारे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मात्र, ज्योती मेटे यांच्याही नावाची चर्चा आहे कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं. याची सल मेटे समर्थकांच्या मनात आजही पाहायला मिळते. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आले आहे. तर, ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. आणि आज त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचीही माहिती आहे.
बजरंग सोनवणे हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उभे राहिले होते…प्रीतम मुंडे यांना 6,78,175 मते मिळाली होती तर सोनावणे यांना 5,09,807 मत मिळाली होती… 1,68,368 मतांच्या फरकाने सोनवणे पराभूत झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘शेतकरी पुत्र’ असा नारा देऊन त्यांनी वातावरणनिर्मिती केली होती आणि आताही त्यांच्या सोशल मीडियावर पुन्हा ‘शेतकरी पुत्र’ असाच नारा दिलाय. यातून ते आताही निवडणुकीच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत. असं असलं तरी सोनवणे सत्तेत आलेल्या स्वत:च्या पक्षापासूनचं दूर राहत असल्याचं चित्र आहे…कारण महायुतीत सामील असल्यामुळे त्यांना उमेदवारीमुळे न मिळाल्याची नाराजी दिसून आली आणि हीच गोष्ट शरद पवारांनी बरोबर हेरली…बजरंग सोनवणे यांची हीच नाराजी शरद पवार दूर करून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान आजच्या ज्योती मेटे यांच्या पक्षप्रवेशामागे बीडची लोकसभेची उमेदवारी असेल तर यामागे शरद पवारांचं काही न काही तर्क असणार हे नक्की…त्यामुळे जर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले तर बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात मविआमधून सोनवणे किंवा ज्योती मेटे यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळणार? की आणखी कोणी उमेदवार असणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल…