महाविकास आघाडीकडून सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार आहे. इथून प्रणिती शिंदे यांचं नाव जवळपास अंतिम असल्याचं स्पष्ट आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे…असं स्वतः प्रणिती शिंदे यांनी देखील म्हटलं आहे.प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळाल्यास महायुतीत त्यांच्या विरोधात कुणाचं त्यांना आव्हान असू शकेल ? सोलापूरचं राजकीय गणित कसं आहे? या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
२०२४ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे सोलापूरच्या रिंगणात उतरल्या आहेत.. पण हि लढाई प्रणिती यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही हे ही तितकंच खरं आहे. याचं कारण म्हणजे सोलापूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभेत असलेलं भाजपचं वर्चस्व…सोलापूर लोकसभेअंतर्गत सोलापूर शहर- मध्य, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट आणि पंढरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ १९९९ पासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सोलापूर शहर उत्तरमध्ये २००४ पासून भाजपचं वर्चस्व आहे. तर सोलापूर दक्षिण विधानसभा २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसच्या हातून निसटली. अक्कलकोट विधानसभेत मात्र कॉंग्रेस आणि भाजप अशी दर पाच वर्षांनी अदलाबदल होतेय. पंढरपूर विधानसभेत आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली.आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्यवर्ती हा मतदार संघ २००९ मध्ये तयार झालाय. पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी ३४ हजार मतांची आघाडी घेतली होती. २०१४ मध्ये ही आकडेवारी घसरून फक्त ९ हजारांवर आली. आणि २०१९ मध्ये १२ हजारांच्या लीडने त्या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना स्वतःच्याच मतदार संघातून धोका आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून जुन्या-नव्या अशा सर्व नेत्यांना सोबत घ्यावे लागेल. आणि मजबूत जाळे उभारताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तेवढ्याच विश्वासाने बरोबर घ्यावं लागणार आहे.महायुतीकडून कोण उमेदवार असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही.. सोलापूरची जागा भाजपच्या वाट्याला आहे..त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप देखील तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. भाजपकडून आमदार राम सातपुते, पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि उद्योजक असणारे मिलिंद कांबळे, माजी खासदार शरद बनसोडे, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या नावांची इथून चर्चा आहे…मागील दोन निवडणुकांमध्ये धक्कातंत्र वापरत भाजपने नवखे उमेदवार दिले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप नेमकं काय करणार? याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल…