पुणे | लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून काही ठिकाणचे उमेदवार देखील फायनल झाले आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात त्यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती बारामती लोकसभा मतदार संघातील प्रचाराची. याठिकाणी शरद पवार यांच्या घरातीलच उमेदवार एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. अजित पवारांनी बंड करून भाजपशी घरोबा केल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांना साथ देण्यासाठी पुढं सरसावलं आहे. अगदी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ गावोगाव फिरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून महायुतीच्या उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी आता अशीच लढाई होईल हे निश्चित आहे. प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि त्याच कारणास्तव बारामती लोकसभा मतदार संघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय चर्चेचा विषय ठरतोय. आता कोणी नेमका काय विषय मांडला की चर्चा सुरू झाली आहे या चर्चेमागच नेमकं कारण काय? हेच जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
बारामती लोकसभा म्हटलं की, पवार हे समीकरण तयार झालं आहे त्यामुळे राज्याचं या मतदार संघावर विशेष लक्ष आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी हे पवारांचं गाव आहे. इथल्या गावकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं आहे असं म्हटलंय एवढचं नाही तर, शेत करायला दिलं म्हणून आपण मालक होत नाही त्याचबरोबर अजित पवारांसारखा नालायक माणूस नाही अशी टीका करत यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी धरल आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोध करत त्यांचे सख्खे बंधू हे शरद पवारांना पाठींबा देताना दिसून आले आहेत त्यामुळेच कदाचित अजित पवारांनी बारामतीच्या सभेत बोलताना, मी आणि माझा परिवार सोडला तर सगळे विरोधात असल्याचं जे सांगितलं होतं ते आता समोर होताना दिसत आहे.