यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने दक्षिण भारतात विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचं हे मिशन दक्षिण नेमकं काय आहे? याचविषयी सदर व्हिडीओतून जाणून घ्या…
‘अबकी बार चारसो पार’ हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ब्रीदवाक्य आहे परंतु हे शक्य कसे होईल? तर…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन दक्षिण’ सुरू केलं आहे कारण दक्षिण भारतातील पाच राज्ये जिंकल्याशिवाय चारशे जागांचा आकडा गाठणे फार कठीण जाईल कदाचित त्यामुळेच यावेळी ‘चार सौ पार’चा नारा देत पंतप्रधान मोदींचा विजय रथ हा दक्षिण भारतात निघाला आहे. दक्षिण भारतात ते एकापाठोपाठ एक रोड शो, रॅली, सभा, हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना दिसून येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० दिवसांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये सभा घेतल्या. 400चे लक्ष्य गाठण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारतातील लोकसभेच्या 129 जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पाच राज्यांमध्ये किती जागा जिंकल्या
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील २८, तेलंगणातील १७, केरळमधील २०, तामिळनाडूमधील ३९ तर आंध्रप्रदेशमधील २५ या पाच राज्यांतील एकूण १२९ जागांपैकी भाजपाने केवळ २९ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकात २८ पैकी २५, तेलंगणात १७ पैकी ४ जागा जिंकल्या होत्या तर केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही.
मात्र, भाजपाने यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे विस्तारीकरण करण्याचा निश्चय केला आहे. जास्तीत जास्त जागांवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सगळे नेते मैदानात उतरले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘मिशन दक्षिण’ सक्सेसफुल होणार का? दक्षिण भारतात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल का? हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरूनच लक्षात येईल.