गेल्या अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात होतं. याच प्रमुख कारण होतं शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी घेतलेली भूमिका. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध करत दंड थोपटले होते. याच अनुषंगाने बारामतीत पवार नको असं म्हणत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलं होतं. मात्र, आता विजय शिवतारेंनी 27 मार्चला रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळं शिवतारे हे फुसका बार निघाले आणि आता ते माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात… पाहुयात याच संदर्भातील हा व्हिडीओ…
विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या विरोधी भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांचं टेन्शन वाढलं होतं. शिवतारे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कारवाई केली पाहिजे, असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं होतं. अशातच बुधवारी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवास्थानी चर्चा केली. यावेळी अजित पवार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले हे देखील उपस्थित होते.
सध्या बारामती लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष विजय शिवतारेंच्या भूमिकेकडं लागलंय. विजय शिवतारे बारामतीतून माघार घेणार का? आणि जर आता त्यांनी माघार घेतली तर आतापर्यंत त्यांनी ज्या राणा भीमदेवी थाटात निवडणूक लढवण्याची घोषणा केली. अजित पवारांवर जे आरोप केले त्याचं काय? म्हणजे विजय शिवतारे हे फुसका बार निघणार का? हे पाहावं लागेल.