शिर्डी | अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांसमोर युवा महिला उमेदवाराने आधीच आव्हान उभ केल्यानं ही निवडणूक तिरंगी झाली आहे. आता महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीकडून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते हे अधिकृत उमेदवार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लोकसभा मतदार संघात मुंबईचं पार्सल या मुद्द्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हा मुद्दा नेमका काय आहे आणि का याची चर्चा होत आहे याच संदर्भात जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेजण कामाला लागले आहेत. सर्व उमेदवार कार्यकर्ते जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. तसेच या मतदार संघातही मोठ्या प्रमाणात सभांचं आयोजन केलं जात आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या मतदारसंघात त्यांच्या प्रचाराला प्रारंभ केला मात्र या सर्व प्रचारात मुंबईच पार्सल हा मुद्दा आता लक्षवेधी ठरत आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मूळचे मुंबईचे आहेत तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांचा जन्म सुद्धा मुंबईत झाला असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं आहे आणि हे मुंबईचे पार्सल आता पुन्हा मुंबईला पाठवण्याची वेळ आली असल्याची टीका त्यांनी त्यांच्या सभेमधून केली आणि तेव्हापासून या मतदार संघात मुंबईचं पार्सल हा मुद्दा प्रचंड गाजताना पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून आता या तिन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघात या आधी शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी थेट लढत होणार असं वाटत असताना वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे त्यामुळे या तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील मतदारांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना संधी दिली आहे. यामध्ये कॉंग्रेस, अपक्ष, भाजप आणि शिवसेना हे पक्ष येतात. पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ हा २००८ च्या पुनर्रचनेनंतर शिर्डी लोकसभा मतदार संघ म्हणून उदयास आला. पूर्वीच्या कोपरगाव या मतदार संघावर तसं पूर्वीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिलं आहे. केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कामातून इथ ठसा उमटवला त्यांनतर बाळासाहेब विखे यांनी मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवलं. मध्यंतरी १९९६ मध्ये भीमराव बडदे यांच्या रूपाने हा मतदार संघ भाजपकडे व १९९८ मध्ये प्रसाद तनपुरे यांच्या माध्यमातून पुन्हा कॉंग्रेसकडे आला. १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर बाळासाहेब विखे खासदार झाले होते मात्र २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विखे हे कॉंग्रेसमधून खासदार झाले. मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजे २००९ पासून शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळालं आहे. २००९ मध्ये शिवसेनेतून भाऊसाहेब वाकचौरे खासदार झाले. २०१४ मध्ये उमेदवारीसाठी शिवसेना सोडून ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. २०१९ मध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे इथून खासदार झाले. इथून त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून यंदा निवडणुकीला उभा आहे.
आता शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात ‘शिवसेना’ विरुद्ध ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचितकडून महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते रणांगणात असणार आहे. शिर्डीचचं नाही तर संपूर्ण राज्यातील मतदारसंघांमधली समीकरणं ही गेल्या चार वर्षांमध्ये बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. आधी मविआचा प्रयोग आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट ही त्याची प्रमुख कारणं म्हणता येतील शिवाय एकाच पक्षातले नेते एकमेकांविरोधात उभा राहून टीका टिपण्णी करताना दिसून येत आहे अशीच टीका करत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुंबईतलं पार्सल पुन्हा मुंबईला पाठवायचं असं आवाहन जनतेला केलं आहे.