लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरू आहे..महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार, जोरदार शक्तीप्रदर्शन, आणि वातावरण निर्मिती केली जातेय.मराठवाडा, विदर्भासह आता पश्चिम महाराष्ट्रात अनेक सभा पार पडतायेत.पण इतक्या सभा कशासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रासाठी एवढा जोर का लावावा लागतोय ? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
महाराष्ट्रात विरोधी पक्ष संपला आहे, शरद पवार संपले आहेत, उद्धव ठाकरे संपले आहेत, लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी नेत्यांच्या तोंडून अशी वाक्ये सातत्याने कानावर पडत होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्यांनी शरद पवारांवर टीका केली, त्या तुलनेत शिवसेनेतून फुटलेल्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेची प्रखरता कित्येक पटींनी जास्त होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष फोडण्यात भाजपला यश आलं. काँग्रेस फुटली नाही, मात्र अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे विरोधक कमकुवत झाले.
महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांत उमेदवार मिळतात की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत महाविकास आघाडीने बाजी मारली. याला सांगली मतदारसंघासारखे काही अपवाद आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, असा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. तो शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी केली आहे.तर महायुतीला नाशिकसारख्या मतदारसंघात अद्यापही उमेदवार जाहीर करता आलेला नाही. हा मतदारसंघ कोणाला सुटणार, हेही निश्चित झालेलं नाही. अजित पवारांच्या वाट्याला जितक्या जागा आल्या, त्यातील शिरूर आणि धाराशिव मतदारसंघात त्यांना इतर पक्षांतून उमेदवार आयात करावे लागले. महायुतीत सर्वाधिक ससेहोलपट झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. भाजपच्या दबावामुळे त्यांना त्यांच्या दोन विद्यमान खासदारांची उमेदवारी कापावी लागली. नाशिकला काय होणार, हे अजून निश्चित झालेलं नाही. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी एकनाथ शिंदेंना रद्द करावी लागली. यवतमाळ – वाशीमच्या पाचवेळच्या खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी देता आली नाही. इकडे महाविकास आघाडीने मात्र महायुतीला तोडीस तोड असे उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार , उद्धव ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या आहेत. महायुतीसाठी राज्यातील नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचा धडाका लावण्यात आला आहे.