मुंबई
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी कार्डच महत्त्वाचं ठरतंय. कारण महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवार निवडताना मराठी माणसालाच प्रथम प्राधान्य दिलं आहे.मविआचे ६ पैकी सर्वच्या सर्व उमेदवार मराठी आहेत. तर महायुतीचे चार उमेदवार मराठी आहेत.त्यामुळे मुंबईत मराठी टक्का अजूनही प्रभावी असल्याचं दिसतो.महाविकास आघाडी आणि महायुतीचं राजकीय भवितव्य या मराठी टक्क्यावर अवलंबून असून उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले आहेत.या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
मुंबईत सर्व राजकीय पक्षांनी मराठी व्होट बँकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईमधील सहाही मतदारसंघात सुमारे २९ टक्के मराठी मतदार आहेत. पण, हा मराठी टक्का विविध राजकीय पक्षांत विभागला गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचं राजकीय भवितव्य मराठी टक्का ठरवणार आहे.मुंबईतील मराठी माणूस गेल्या काही वर्षांमध्ये विकासाच्या प्रक्रियेत मुंबई बाहेर फेकला गेला. ही वस्तुस्थिती असली, तरी सहाही लोकसभा मतदारसंघात अजूनही मराठी माणूस टिकून असून संसदीय राजकारणासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
यामुळे विविध राजकीय पक्षांतील मराठी नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. त्यात ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षांचा पाया मराठी माणूस आहे, तर भाजप आणि काँग्रेस या पक्षांना वाढवण्यासाठी मराठी माणसांची भूमिका आजवर महत्त्वाची ठरली आहे. अन्य लहान पक्षही याच मतांच्या बळावर राजकारण करत आहेत. या लोकसभा निवडणुकीतही मराठी टक्का निर्णायक ठरणार असून ही व्होट बँक मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे.