सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरावर आहे. राज्यातील बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आज बीड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदंनी पंकजा मुंडेंचं कौतुक करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, आजचं बीडमधील सभेचं स्टेज खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांचे बंधू आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी गाजवलं. नरेंद्र मौदी यांचं सभेसाठी आगमन होण्यापूर्वी धनंजय मुंडेंनी स्टेजवरून विरोधकांवर आणि महाविकासआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर चांगलाच निशाणा साधला. चंदन तस्करी करणाऱ्या उमेदवाराला बीड जिल्ह्यातील जनतेनं मत द्यायचं का? असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडेंनी बजरंग सेनवणेंना आव्हान दिलं.
बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत कृषीमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला धनंजय मुंडेंनी बीज डिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचं आहे असं सांगत. बीड जिल्ह्याला सर्वात मोठा ऊस उत्पादक जिल्हा बनवायचं आमचं स्वप्न आहे असं सांगितलं. सोबतच समोरच्या उमेदवाराला बीड जिल्ह्याचा भौगोलिक इतिहास माहिती नसेल असं म्हणत धनंजय मुंडेंनी बजरंग सोनवणेंवर निशाणा साधला.
चंदन तस्कराला मत द्यायचं का?
बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल करताना धनंजय मुंडे म्हणाले की, “समोरचा उमेदवार म्हणतोय मी शेतकरी पुत्र आहे. पण, मी सुद्धा कृषीमंत्री आहे. मला सुद्धा बघावं लागेल हा शेतकरीपुत्र नेमकी कशाची शेती करतो.” पुढे बोलताना “अशा चंदन तस्कराला बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का नाही याचा बीड़ जिल्ह्याची जनता विचार करेल” असं म्हणत धनंजय मुंडेंनी बजरंग सोनवणेंवर टीकास्त्र डागलं. सोबतच देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी पंकजा मुंडेंना बहुमतानं विजयी करावं असं आवाहनही यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं.