लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात प्रचार सभा सुरु आहेत. 1 मे रोजी महाराष्ट्रात नंदूरबार येथे पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत जनतेला संबोधित केलं. तिसऱ्या टर्ममध्ये गरीबांना अधिक घर देणार असल्याच त्यांनी सांगितलं. सोबतंच नरेंद्र मोदींनी या सभेवेळी शरद पवारांना खुली ऑफरही दिली. शरद पवारांनी अजितदादा, शिंदेंसोबत यांव त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी ऑफर नरेंद्र मोदींनी यावेळी शरद पवारांना दिली.
नंदुरबारच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. नकली शिवसेना म्हणत मोदींनी पुन्हा ठाकरे गटावर निशाणा साधला. “नकली शिवेसना मला गाडण्याची भाषा करत आहे. बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांना आज किती दु:ख होत असेल” अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर सोबतंच शरद पवारांना मोदींनी थेट महायुतीसोबत येण्याचं आवाहन केलं.
“बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली असली, तरी त्यांना एक ऑफर सुद्धा दिली आहे. “काँग्रेसोबत जाऊन मरण्यापेक्षा शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
मात्र, नरेंद्र मोदींनी दिलेली ही ऑफर लगोलग शरद पवारांनीही नाकारली. “गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही,” असं म्हणत शरद पवारांनी मोदींच्या या आवाहननावर प्रतिक्रिया दिली.