नवी दिल्ली | देशभरात निवडणूक सुरु होण्यापूर्वी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपात अंमलबाजवणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली होती. आता तब्बल ५० दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचार जोरात सुरु आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप वाढत असताना, अरविंद केजरीवाल यांच्या जामिनामुळे विरोधकांची ताकद वाढली असल्याचं मानलं जात आहे. शिवाय आज केजरीवाल आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. याशिवाय केजरीवाल दक्षिण दिल्लीतील महरौली भाग आणि पूर्व दिल्लीच्या कृष्णानगरमध्ये रोड शो करणार आहेत.
केजरीवाल यांनी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मला तुमच्यात येऊन आनंद होतोय. या हुकूमशाही विरुद्ध मला लढायचं आहे. परंतु देशातल्या १४० करोड लोकांनी या लढाईत एकत्र आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल यांच्या जामीनावर प्रतिक्रिया देताना ते जरी जामिनावर बाहेर आले असले, तरी जनता मद्य घोटाळा विसरणार नसल्याचं म्हटलंय…
आप या पक्षाकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘बंदे मे है दम!’ हे प्रचार गीत देखील प्रकाशित करण्यात आलं आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पक्षानं या मुद्द्यावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. आता केजरीवाल प्रत्यक्ष प्रचारात सक्रीय झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील प्रचार अधिक रंगतदार होणार आहे. आरोपांच्या या तोफांमध्ये जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज किती मांडला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल.