बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली…महायुतीतील अनेक बड्या नेत्यांनी मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. आणि आता नुकतंच बीड मतदारसंघामध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली. जिथे त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलं.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत. आणि आता १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे… यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. बीड लोकसभा अगदी सुरुवातीपासून चर्चेत राहिला आहे.गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांची नाराजी सातत्याने समोर आली. त्यांना राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून डावललं गेल्याची चर्चा सतत होत राहिली. आणि अखेर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर बहीण प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं आव्हान आहे. इथं मराठा आरक्षण मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. पंकजा मुंडे यांनी ठिकठिकाणी सभा घेत मतदारसंघ पिंजून काढला आहे. अशात आज प्रचार करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजप नेते उदयनराजे यांची जाहीर सभा पार पडली. ज्यामध्ये उदयनराजेंनी भावनिक आवाहन करत मतदारांना साद घातली. याचवेळी उदयनराजेंना अश्रूही अनावर झाले.
सभेतील भाषणात उदयनराजे भोसले म्हणाले, ‘आता पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन. खासदार म्हणून त्या निवडून आल्या की त्यांच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार.’ असंही उदयनराजे म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरल. मी मनापासून सांगतो पंकजाला मतदान केलं नाही, तिला जर निवडून दिलं नाही, तर मी राजीनामा देईन आणि साताऱ्यातून तिला निवडून आणेन हे लक्षात ठेवा. पण तसं होत नाही. मी येताना बघत होतो चोहो बाजूंनी कंपाऊंडला कुलूप लावतो. हो म्हणालात तर सोडतो. नाहीतर नाही सोडत.’ असंही उदयनराजेंनी बीडकरांना मतदानाचं आवाहन करत गंमत केली. पंकजा मुंडेंसाठी जनतेसमोर उदयनराजेंनी भावनिक साद साद देखील घातली.
‘एका जीवाभावाच्या व्यक्तीला मदत करायची की नाही. तिला संधी मिळाली पाहिजे की नाही? ती काळ्याची पांढरी झाल्यानंतर तिला संधी मिळणार का?’, असा सवाल उदयनराजे यांनी जनतेला विचारला. तसंच, ‘मी कुणाचे कौतुक करायला आलो नाही. महाराजांचे नाव घेऊन विकास करत आहेत. गरिबी हटाव म्हणून काम करत आहे.’, असं देखील त्यांनी सांगितलं.’एक सांगतो कृपा करा, माझ्या बहिणीला निवडून द्या. तलवार उपसा आता. मी आलो हिच्याकरता नीट वागा. आता वाकून नमस्कार करतो तुम्हाला तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय.’ असं म्हणत उदयनराजेंनी पंकजा मुंडेंसाठी जनतेसमोर भावनिक साद घातली.