राज्यभरात विविध ठिकाणी सध्या अवकाळी पावसानं हजेरी लावलीये. राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईत सध्या पावसानं अवघ्या तासाभरात हाहाकार माजवलाय. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडूमध्ये मोठा पाऊस पडत असून रस्त्यांच्या कडेला पाण्याचा लोट असल्याचं दिसतंय. तर अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी मंदगतीने सुरू आहे. तर घाटकोपर ते वर्सोवाची मेट्रो व्यवस्थाही ठप्प झाल्याची माहिती समोर आलीये.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर उकाड्यामुळं चांगलेच हैरान झाल्याचं पहायला मिळत होतं. अशा परिस्थितीत आज आलेल्या अवकाळी पावसानं मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, याउलट अवकाळी पावसानं मुंबईकरांना चांगलाच दणका दिल्यातं समोर आलंय. अवकाळी पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा झाल्याचं आणि रस्त्यावर वाहनांच्या लांबट लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे पाऊस आणि वादळी वाऱ्यामुँळ मुंबई विमानतळावरील रनवे बंद केल्याचीही माहिती समोर आलीये. शिवाय मुंबईक उतरणाऱ्या अनेक फ्लाईट्स सध्या दुसरीकडे वळवण्यात आल्यात. तर दुसरीकडे मुंबई उपनगरातील अनेक रस्त्यांवर वाहतूकीचा खोळंबा झालाय. जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळली. जागोजागी झाडं कोसळल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबल्याचं दिसून आलंय. मुंबईतील कोस्टल रोडवर मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याची माहिती आहे.
मेट्रो, मध्य-रेल्वे विस्कळित
मुसळधार पाऊस, वादळी वारे यामुळे मुंबईकरांचा खोळंबा झाल्याचं दिसतंय. अचानक आलेल्या पावसामुळे अंधेरी घाटकोपर मेट्रो खोळंबली आहे. तर लोकलसेवाही ठप्प झालीये. मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.
विविधं ठिकाणी होर्डिंग कोसळले
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळला असून त्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू झालंय. या होर्डिंगखाली आतापर्यंत 80 वाहनं अडकल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे वडाळा पूर्व या ठिकाणी असलेल्या श्रीजी टॉवर्स इथे पार्किंग स्ट्रक्चर खाली कोसळल्याची घटना घडलीये. बरकत आली नाक्याजवळ रस्त्यावर हे स्ट्रक्चर कोसळलं आहे. या ठिकाणीही बचावकार्य सुरू आहे. त्यामुळे अवघ्या तासभरासाटी आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईत हाहाकार निर्माण झाल्याची स्थिती सध्या समोर येतेय.