नाशिक | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिकमधील येवल्यात बोलताना, आता राजकीय वर्तुळात बरीच गणिते बदललेली आहेत…त्यामुळे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. राजकारणात नवीन चेहऱ्यांना पुढे आणलं जात आहे. तरुण मंडळी अधिक सक्रीय झालेली पाहायला मिळत आहे. तरुणांना संधी देण्यासाठी शरद पवार हे नेहमीच आग्रही असतात पण एखाद्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल तर परत येणाऱ्या आमदारांचा त्या मतदारसंघात विचार केला जाईल असं विधान केलं आहे. आता जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या आमदारांसाठी परतीचे दरवाजे उघडे केल्याने हे आमदार त्यांना प्रतिसाद देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मविआ 32 ते 35 जागा जिंकणार; व्यक्त केला विश्वास
याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. जनतेला देशातील संविधान वाचवायचे आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता प्रचंड त्रासलेली आहे. जीएसटी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती कमी असताना गॅस, पेट्रोल, डिझेल महाग झाले आहे त्यामुळे जनता वैतगाली असून जनतेला महाविकास आघाडी हा महत्त्वाचा पर्याय वाटतोय. त्यामुळेच आमच्या 32 ते 35 जागा निवडून येतील असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
निवडणूक आयोग डोळे बंद करून बसलंय?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत पैशांचा प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय. शेवटच्या दोन-तीन दिवसात सर्व प्रकारचा अवलंब केला जात आहे आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसले आहे. तक्रार करूनही पोलीस प्रशासन कुठेही जात नाही अशा प्रकारचा अनुभव येतोय. कोणतीही कारवाई होत नसल्याची आमची प्रमुख तक्रार आहे. बीड, परळीमध्ये आमच्या उमेदवाराने रिपोलची मागणी केली आहे. मात्र बीडचे जिल्हा प्रशासन काहीच करताना दिसत नाही असं पाटील म्हणाले.