सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशभरात चार टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं असून आणखी 3 टप्प्यांतील मतदानप्रक्रिया बाकी आहे. मात्र, अशा परिस्थितीत समाजवादी पार्टीला एकामागोमाग एक दोन झटके बसल्याचं पहायला मिळतंय. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे जुने सहकारी आणि महान दलाचे अध्यक्ष केशव देव मौर्य यांनी पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी जनवादी पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष संजय चौहान यांनीही सपाला भाजपची बी-टीम म्हणत पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वातावरणात समाजवादी पार्टीला दोन मोठे झटके बसले आहेत.
निवडणूक सुरू असतानाच केशव देव मौर्य यांनी एक प्रसिद्धपत्रक जारी करत समाजवादी पक्षाला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. या प्रसिद्धीपत्रात केशव देव मोर्य यांनी “जयंत चौधरी, स्वामी प्रसाद मौर्य आणि पल्लवी पटेल यांनी अखिलेश यादव यांची साथ सोडली तेव्हा मी समाजवादी पक्षाच्या पाठीशी खडकासारखा उभा राहून पाठिंबा दिला होता. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महादलाकडे पाठिंबा मागितला होता. महान दलाला कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाही. मोठी निवडणूक असल्याने महादलाकडे उमेदवार नव्हता, त्यामुळे समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला.” असं म्हणत स्पष्टीकरण दिलं.
“निवडणुकीसाठी सपाला पाठिंबा देताना आम्ही त्यांचे संवाददाता उदयवीर सिंह यांना जन अधिकार पक्षाटे अध्यक्ष बाबूसिंह कुशवाह यांच्याबाबत विचारलं होतं. कुशवाह सपासोबत येणार असतील तर मी समाजवादी पार्टीला पाठिंबा देणार नाही असं स्पष्ट केलं होते. मात्र, त्यावेळी उदयवीर सिंह यांनी कुशवाह सपासोबत येणार नाहीत असं स्पष्ट केलं होतं. मात्र, निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर समाजवादी पार्टीनं कुशवाह यांना सोबत घेतलं. याच कारणांतून मी माझा समाजवादी पार्टीला असलेला पाठिंबा काढून घेत आहे.” असं म्हणत केशव देव मौर्य यांनी समाजवादी पार्टावर निशाणा साधलाय.
“समाजवादी पक्ष महादलाकडे सातत्याने दुर्लक्ष करत असताना समाजवादी पक्षाने महादलाला जागा दिली नाही तरी मी सोबत आलो, पण मला महत्त्व मिळत नसेल तर मी पाठिंबा देऊ शकत नाही. त्यामुळे जड अंत:करणाने मी समाजवादी पक्षाचा पाठिंबा काढून घेत आहे.” असं म्हणत केशव देव मौर्य यांनी समाजवादी पार्टीला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत समाजवादी पार्टाला एकामागोमाग एक दोन झटके बसल्याचं बोललं जातंय.