काल महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदी यांचं भाषण सुरु असताना एका तरुण शेतकऱ्याने कांद्यावर बोला असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. घडलेल्या या घटनेनंतर त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या तरुणाचे कौतुक केले आहे.
नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या त्या तरुण शेतकऱ्याचे नाव किरण सानप असे असून तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं समोर आले आहे. किरण हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आयटी सेलचा पदाधिकारी आहे. सानप हा गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीतही काम करत आहे.
यावर शरद पवार म्हणाले की, मोदींना कांद्यावर बोला असा तरुण शेतकर्यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे. या शब्दात शरद पवार यांनी मोदींना कांद्यावर बोला हे विचारणाऱ्या तरुणाचे कौतुक केले आहे.
पीएम मोदी कांदा प्रश्नावर काय म्हणाले?
जेव्हा भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु होतं त्यादरम्यान किरण याने घोषणाबाजी करत कांदा प्रश्नावर बोला असं म्हटलं. त्याच्या घोषणाबाजीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांदा प्रश्नावर भाष्य केले. ते म्हणाले की, कांदा स्टॉक करण्याचे काम आमच्याकडून सुरु करण्यात आले आहे. 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही आतापर्यंत खरेदी केला. आता 5 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढली आहे. निर्यातीसाठी आम्ही अनुदानदेखील दिले आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळांनी देखील कांदाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिले आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.