छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत दुष्काळाबाबत बैठक पार पडली. यावेळी पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात नाम फाऊंडेशन, आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण, अमिर खान यांचे पाणी फाऊंडेशन अशा अनेक एनजीओंच्या मदतीने गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर स्टोरेज कॅपेसिटी वाढली तर पाणीसाठा वाढेल. पाण्याचे नियोजन व्यवस्थित व्हावे, यासाठीही त्यांनी सूचना दिल्या आहेत. याशिवाय पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नये अशीही सूचना त्यांनी उपस्थितांना दिली.
मराठवाड्यात 1,837 टँकर सुरु आहेत त्यातील 1,250 गावांमध्ये हे टँकर जात आहेत. टँकर्सची आवश्यकता भासली तर ग्रामसेवकांपर्यंत, तलाठ्यांपर्यंत सूचना दिल्या आहेत. त्यांना काय गरजेचं आहे, याची माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानुसार पुरवठा केला जाणार आहे. शिवाय टँकर आणि चाऱ्याची देखील व्यवस्था केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
…तर तुरुंगात टाकणार
दरम्यान, बोगस बियाणे आणि खत आढळले तर तुरुंगात टाकले जाणार आहे. मुख्य सप्लायरचा सर्व्हे करून तपासणी करणार आणि बोगस बियाणांची अडचण येणार नाही, याची काळजी घेऊ. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सूचना दिल्या आहेत. अवकाळीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.