राजकारण आणि समाजकारणात दिलेला शब्द पाळणारी माणसं फार दुर्मिळ असतात. मात्र शब्दाशी पक्के आणि किती ही राजकीय किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर. पण शब्दाशी जागणारं, विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व म्हणून पी. एन.पाटील यांची ओळख होती.अलीकडच्या फोडाफोडीच्या राजकारणात आमदार पी. एन.पाटील यांनी आपलं वेगळेपण कसं जपलं होतं. या व्हिडिओतून पाहू..
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेमुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठं वादळ आलं..यामध्ये राज्यभरातून काँग्रेसमधील अनेक मात्तबर नेत्यांनी शरद पवार यांचं नेतृत्व मान्य करत काँग्रेस सोडली. याला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नव्हता. जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे पुढारी राष्ट्रवादीत सहभागी झाले. जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष जवळपास रिकामा झाला होता. अशा कठीण परिस्थितीत पी एन पाटील यांच्या खांद्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली. कोणतीही तक्रार न करता पी एन पाटील यांनी १९९९ पासून २०१९ पर्यंत तब्बल २० वर्षे ही जबाबदारी पार पाडली. या काळात त्यांच्या यशापयशांचा विचार न करता त्यांनी केलेलं काम कौतुकास्पदच होतं.
एखाद्याशी मैत्री केली तर त्याच्याशी गद्दारी कधी करायची नाही त्यासाठी मग कितीही शक्तीवानाला अंगावर घेण्याची तयारी त्यांच्यात होती. दिलेल्या शब्दाला कसं जागावं..याचं एक उदाहरण घालून दिलं. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना राहिली.पी. एन. पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केल्यापासून ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसची साथ कधीच सोडली नाही. राजकीय जीवनात अपयश येत असतानाही त्यांनी कधीच पक्षावरील निष्ठा कमी होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांची काँग्रेसमन अशीच ओळख झाली. स्वर्गीय विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती. विलासरावांच्या कार्यकाळात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत होती तेव्हा तेव्हा पी. एन. पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली. मात्र, मंत्रिपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली.पांडुरंग निवृत्ती पाटील असं त्यांचं पूर्ण नाव असलं तरी त्यांची पी. एन. पाटील अशीच आयुष्यभर ओळख राहिली.