लोकसभा निवडणुकीतील यंदाच्या हंगामात राजकीय नेत्यांची पुढची चांगलीच आक्रमकपणे प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना फुटीमुळे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे जबाबदारी घेऊनच मैदानात उतरल्याचं दिसून आलं. शिवसेना व महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांसाठी रोड शो व प्रचारसभांमधून ठाकरे शैलीत सरकावर हल्लाबोल केला. दुसरीकडे शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार हेही आक्रमक झाल्याचे दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीही महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार केला. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हेही राजसभेत दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मनसेने थेट सहभाग घेतला नव्हता. मात्र, गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेशच मनसैनिकांना दिले होते. आता, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दुसरे ठाकरे थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी ज्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आलं, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसून आला. त्यावरुन, आता अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क, वरळीसह अनेक भागात अमित ठाकरेंचे होर्डींग्ज लावल्याचे दिसून आले. तर, मनसैनिकांनीही त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. चेंबुरमध्ये मंत्रालय व लाल दिव्याच्या गाडीचा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.
अमित ठाकरे यांच्या वाढदिनी मनसैनिकांनी मध्यरात्रीच मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. मनसेचे चेंबूर विभागाचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी अमित ठाकरेंसाठी आणलेला केक चर्चेचा विषय ठरला. विधान भवन, मंत्रालय आणि लाल बत्तीची गाडी असलेला हा केक अमित ठाकरेंनी लवकर मंत्रालयात जावे, या शुभेच्छा देणारा होता. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांनी देखील हा केक कापून मनसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. अमित ठाकरे हे तरुणांचा आवाज आहे, तो मंत्रालयात जावा या शुभेच्छा देत आम्ही मनसैनिक कामाला लागलो आहोत, म्हणून हा अनोखा केक त्यांच्यासाठी आणल्याचे मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी यावेळी सांगितले.
अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तत्पूर्वी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी, राज ठाकरेंसमवेत अमित ठाकरेही भेटीसाठी हजर होते. या भेटीनंतर त्यांनी ग्रेटभेट असं कॅप्शन लिहून फोटोही शेअर केले होते. तर, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची सांगता सभा झाली. या सभेदरम्यान अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, अमित ठाकरे आता संसदीय राजकारणात सक्रीय होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही काही सूचक संकेत देण्यात आले आहेत.