पुणे हिट अँड रन प्रकरणावर अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना घडल्यानंतर अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते. त्यामुळे दादा नेमके गेले कुठे असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला.दरम्यान या घटनेला ६ दिवस होऊन गेल्यानंतर अजित पवारांनी आज अखेर पुण्यात टायटन घड्याळच्या शोरुमच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली. यावेळी अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणाकडे आपलं बारकाईने लक्ष आहे. घटना समजल्यापासून पहिल्या दिवसापासून या घटनेकडे आपलं लक्ष आहे. तसेच या प्रकरणावर आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा देखील केल्याची माहिती अजित पवारांनी दिली. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
“कुणावरही आकस बुद्धीने काही कारवाई होणार नाही. पण जे कुणी दोषी असतील ते किती मोठे असले, कितीही श्रीमंत असले, कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी रितसर जी काही कारवाई असेल ती केली जाईल. कायदा हा श्रीमंताला, गरिबाला आणि मध्यमवर्गीयालादेखील सारखा आहे. नियम सगळ्यांना सारखे आहेत. त्याचप्रमाणे कारवाई चाललेली आहे”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली.
मी 20 आणि 22 तारीख या दोन्ही दिवशी सकाळी 9 वाजेपासून मंत्रालयात होतो. मी या घटनेच्या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून होतो. माझं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. देवेंद्रजी मला म्हणाले की, मी तातडीने पुण्याला निघालो आहे. मी स्वत: त्याकडे जातीने लक्ष घालणार आहे. त्यांनी लक्ष घालून पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजात केला जातोय की, या प्रकरणाकडे पालकमंत्र्याचं लक्ष नाही”, असा खुलासा अजित पवारांनी केला. अजित पवार यांनी बोलताना पुण्यामध्ये अनधिकृत संस्कृती वाढल्याचे मान्य केले. या संदर्भात कारवाई केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अजित पवार यांनी घाटकोपरमध्ये झालेल्या कारवाईवर सुद्धा भाष्य केलं. त्या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे मुख्य सचिवांनी पत्र लिहिलं असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.