पुणे | पुण्यात गेली अनेक दिवस पोर्शे कार अपघात प्रकरण प्रचंड गाजताना दिसत आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यात आता ससून रूग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर या दोन डॉक्टरांसह शिपाई अतुळ घटकांबळे यांना रक्ताचे नमूने बदलल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आणि त्यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा आमदार सुनील टिंगरे या घटनेच्या केंद्रस्थानी आले. आता ससून रुग्णालय आणि टिंगरे यांचा काय संबंध आहे? याचविषयी जाणून घेण्यासाठी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
दिनांक १८ मे २०२४ ला रात्रीच्या सुमारास पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका आलिशान सुपरकारने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ज्या चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली ती गाडी एक बड्या घरातला बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्यावेळी या धनिकपुत्राला स्थानिक नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला बाल न्यायालयात दाखल केलं होतं. न्यायालयानं तो अल्पवयीन असून त्याच्यावर लावण्यात आलेल कलम हे जामीन पात्र असल्यामुळं त्याला काही प्रमुख अटींवर जामीनही मंजूर केला. त्यांनतर पोलिसांनी त्याला पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा आरोप करण्यात आला होता असे अनेक खुलासे समोर येऊ लागले. सुरूवातीला, ज्या रात्री ही अपघाताची घटना घड़ली त्यादिवशी एक आमदार पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली होती. यात वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव समोर आले. या घटनेनंतर टिंगरे समोर न आल्याने अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे शेवटी टिंगरे यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांचे विशाल अग्रवालशी जूने संबंध असल्याची माहिती दिली. विशाल अग्रवालचा मला फोन आला होता आणि त्यांच्याच सांगण्यावरूनच मी पोलीस स्टेशनला गेल्याचं टिंगरे यांनी सांगितलं होतं.
या प्रकरणात नंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले होते. नंतर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने पुण्यातील ससून रूग्णालयात बदलल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी या रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर यांच्यासह शिपाई अतुळ घटकांबळे यांना अटक केली होती. डॉक्टरांच्या अटकेनंतर आता पुन्हा एकदा सुनील टिंगरेंचं एक नवीन कनेक्शन समोर आलंय. ससून रूग्णालयातील डॉक्टर अजय तावरे यांच्या शिफारशीसाठी टिंगरेंनी 2023 मध्ये एक पत्र दिले होते. तावरे यांची नियुक्ती ससून रुग्णालयाच्या अधीक्षकपदी करावी अशी मागणी करणारे शिफारस पत्र आमदार टींगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहलं होतं. त्यामुळे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपी डॉक्टर अजय तावरेंची शिफारस केल्याने पुन्हा एकदा टिंगरे संशयाच्या चक्रव्युव्हात सापडले आहेत. त्याबरोबरच डॉक्टरांना अटक झाल्यानंतर टिंगरे गायब झाल्याची चर्चा सुरू झालीय. आता सुनील टिंगरे नेमके गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याशिवाय या प्रकरणात सुनील टिंगरेंचे नाव वारंवार समोर येत असल्यामुळे पोलीस त्यांना चौकशीला बोलावण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतीय…
आमदार सुनील टिंगरे यांच्या गायब झाल्याच्या चर्चेमुळे आम्ही फोन करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा आणि यासंबंधी त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यस्तरीय बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार टिंगरे अनुउपस्थित होते अशीही माहिती आहे.
आता या प्रकरणात पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. याची चौकशीदेखील पुणे पोलीस खोलात जाऊन करताना दिसत आहे. अगदी बारीकसारीक पुरावे पुणे पोलीस गोळा करताना दिसतायत. जेणेकरुन आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि अग्रवाल कुटुंबियांची अरेरावी कायमची थांबेन. त्यातच आता पुणे पोलीस या सगळ्या अपघाताची माहिती मिळवण्यासाठी अॅडव्हान्स तंत्रज्ञान म्हणजेच एआयचा वापर करणार आहेत पुणे पोलीस ‘एआय’द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार आहे. आता पोलिसांना यातून किती माहिती मिळते तेही पाहावं लागेल. तर सध्या पेचात अडकलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांची पुढची भूमिका काय असेल यावरही सर्वांच्या नजरा आहेत.