पुणे हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी आरोपींचे दोन सॅम्पल घेतले होते. ससून रुग्णालयाप्रमाणे औंधच्या रुग्णालयात सॅम्पल दिले होते. ते सॅम्पल त्याच्या वडिलांच्या सॅम्पलशी मॅच झाले. पण ससून रुग्णालयातील सॅम्पल मॅच झालं नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सॅम्पल बदलल्याचं स्पष्ट झालं. आणि या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ अजय तावरे ला अटक करण्यात आली.. पण डॉक्टर तावरे आणि वाद इथंच थांबत नाही. एवढाच एक विषय डॉ. अजय तावरेबाबत नाही. याआधीही अनेक प्रकरणांमध्ये तावरेचं नाव समोर आलं. डॉ तावरे अनेकदा मोस्ट वाँटेड राहिलाय पण कारवाईपासून कायमच दूर राहिलाय. या मोस्ट वाँटेड डॉ अजय तावरे याने आता पर्यंत नेमके काय काय कारनामे केलेत. या व्हिडिओतून पाहुयात…
पुणे शहरातील बड्या बिल्डरच्या मुलाने केलेलं “हिट अँड रन” प्रकरण संवेदनशील बनलं आहे. या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल व आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना या प्रकरणात अटक झाली आहे. या बड्या लोकांनी सर्वात आधी पोलीसांवर दबाव आणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय.त्यानंतर चालकाला धमकावणे, डांबून ठेवणे असे प्रकार केले. आणि त्यानंतर समोर आलं ते आरोपी वेदांत अगरवालच्या ब्लड रिपोर्टचं फेरफार प्रकरण.. रुग्णालयात घेण्यात आलेले रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपावरून डॉ अजय तावरे याच्यासह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. आरोपीचं ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्यात फेकून देण्यात आलं आणि दुसऱ्या ब्लड स्मॅपलला वेदांत अगरवालचं नाव वापरलं असल्याचं निष्पन्न झालं आहे..आता डॉ.अजय तावरे याचा हा काही पहिलाच कारनामा नाही. तर यापूर्वीही तीन प्रकरणात तावरे याचं नाव समोर आलं होतं. त्याचे आमदार सुनील टिंगरे यांच्याशीही खास कनेक्शन असल्याचं बोललं जातं…
तावरेचं पहिलं प्रकरण समोर आलं ते किडनी प्रत्यारोपण रॅकेट…कोल्हापूरच्या एका महिलेला १५ लाख रुपयांचं आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. महिलेला एजंटच्या माध्यमातून पुण्यात आणून रुबी हॉल क्लिनिकमध्ये तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. मात्र आर्थिक व्यवहार फिस्कटल्याने त्या महिलेने पोलीसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी बराच गदारोळ झाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर अधीक्षक असलेल्या डॉ. अजय तावरे याला निलंबित करण्यात आलं..त्यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे होते. त्यानंतर डॉ. काळे यांची बदली झाली. डॉ. काळे यांची गेल्या वर्षी पुन्हा अधिष्ठातापदी नियुक्ती झाली. त्यानंतर महिनाभरात डॉ. काळे यांनी डॉ. तावरेची अधीक्षकपदी पुन्हा नियुक्ती केली. डॉ. तावरे याच्याकडे न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाचा कार्यभार असतानाही त्यांच्याकडे अधीक्षकपद सोपवण्यात आलं. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. कारण डॉ. तावरे ला किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणात अद्यापपर्यंत ‘क्लीनचिट’ मिळालेली नाही.दुसरं ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरण.येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत होता. रुग्णालयातून तो ड्रग्ज रॅकेट चालवायचा.पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हे ड्रग्ज रॅकेट उघड करताना ललित पाटीलच्या दोन साथीदारांना दोन कोटी रुपयांच्या मॅफेड्रॉनसह अटक केली होती. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो रुग्णालयातून पळून गेला..यासाठी डॉ तावरेनी ड्रग तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप झाला होता.तिसरं प्रकरण म्हणजे ससून रुग्णालयात उंदीर चावून रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात डॉ अजय तावरे याचं नाव आलं.रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका रुग्णाला उंदीर चावल्याचं प्रकरण यावर्षीच एप्रिलमध्ये घडलं होतं.सुरुवातीला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. पण शवविच्छेदन अहवालात मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं.या प्रकरणाच्या चौकशी समितीमध्ये डॉ. तावरे दोषी आढळला होता. डॉ. अजय तावरे याने पोस्टमार्टम रिपोर्टच्या अहवालासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितल्याचं समोर आलं होतं. चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती. यात तावरे याची उचलबांगडीही करण्यात आली.डॉ. तावरेचं अधीक्षकपद काढून घेण्यात आलं. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी थेट आदेश काढून ही कारवाई केली होती. त्यावर कार्यवाही करण्याऐवजी डॉ. काळे यांनी डॉ. तावरे याने पद सोडू नये, असा आदेश सुरुवातीला काढला. नंतर त्याच दिवशी अधीक्षकपद सोडून डॉ. यल्लाप्पा जाधव यांना पदभार सोपविण्याचा आदेश डॉ. काळे यांनी दिला. एवढ्यावरच न थांबता, ‘डॉ. जाधव यांच्या नियुक्तीचा पुनर्विचार करावा, असं गोपनीय पत्रही डॉ. काळे यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना लिहिलं होतं. त्यामुळे डॉ. काळे हे डॉ. तावरे ला पाठीशी घालत असल्याची चर्चा ससूनमध्ये सुरू आहे.
आमदार सुनील टिंगरे यांचं कल्याणीनगर अपघात प्रकरणात नाव समोर आलं होतं.त्यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी असलेल्या मुलाची भेट घेतली, पोलिसांवर दबाव आणला असा आरोप झाला. आता याच प्रकरणात अटक झालेल्या डॉ. तावरे याच्याशी आमदार टिंगरे यांचं खास कनेक्शन असल्याचं बोललं जातंय.आमदार टिंगरे यांनी किडनी प्रत्यारोपण प्रकरणात निलंबित झालेल्या डॉ. तावरेची पुन्हा नियुक्ती करण्यात यावी यासाठी शिफारस पत्र दिलं होतं.. आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गत डिसेंबरमध्ये तावरेंच्या नियुक्तीचे आदेश दिल्याचं समोर आलं होतं.आतापर्यंत अनेक प्रकरणात मोस्ट वाँटेड राहिलेल्या डॉ. अजय तावरे याच्यावर कोणाची मेहेरनजर आहे. कोणाला डॉ तावरेची इतकी वारंवार गरज भासते. कोण त्याला वारंवार वाचवतंय.आणि का वाचवतंय हे खरे प्रश्न आहेत.डॉ तावरेला आता कल्याणीनगर अपघातातील रक्त नमुन्यांची अदलाबदल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.