शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याबाबत अनेकदा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज पहिल्यांदाच त्यांनी यावरून भाजपवर थेट टीका केली आहे.राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर थेट भाजपवर हल्ला चढवला आहे.मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आज मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन केलं.मात्र, त्याचवेळी त्यांनी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरून भाजपवर टीकाही केली. ‘भाजपने बाळासाहेब ठाकरे या नावाला अंडरएस्टिमेट केलं.’ असं म्हणत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच आपला संताप व्यक्त केला आहे.
‘शिवसेनेचे चिन्ह आणि नाव हे बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. त्याला तुम्ही हात घालू नका ते उद्धव ठाकरेंचे नाही हे दिल्लीत अमित शहा यांना सांगितले होते.”बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनता भावनिक आहे. पक्ष आणि चिन्ह काढू नका असे भाजप नेत्यांना अमित शाहांनाही सांगितले होते. पण बाळासाहेब ठाकरे या नावाला भाजपने अंडरएस्टिमेट केले. हे चिन्ह आणि नाव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कमावलं होतं.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.तसेच लोकसभा निवडणूक निकालाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. “उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे.” “उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे. त्यामुळे जनता आता मनसेची वाट पाहत आहे. 200 ते 225 जागांवर निवडणूक लढायची तयारी ठेवा”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.मागायच्या तर २० का मागू? 225 जागांवर आपले उमेदवार लढवू. जनता मनसेची वाट बघत आहे. 200 ते 225 जागांवर आपण तयारी करतोय. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच काही जागावाटपाचं ठरत नाही. मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही”, असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.